करमाळा (सोलापूर) : करमाळा येथून समीर माने यांची बदली झाल्यापासून येथील तहसीलदारांचा पदभार हा प्रभारींकडे आहे. तालुक्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पद असतानाही याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. करमाळ्यासाठी काही नावे निश्चित झाली होती, मात्र श्रेय वादात येथे तहसीलदार येऊ शकले नाहीत, अशी चर्चा असून सर्वसामान्यांची यात गैरसोय होत आहे.
करमाळा हा सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तहसीलदार पदाचा प्रभारींकडे पदभार असल्याने अनेकजणांची कामे होत नसल्याची तक्रार आहे. येत्या काही दिवसात तालुक्यातील महत्वाच्या १६ ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. जेऊर, केम, वीट अशा मोठ्या गावांचा यामध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात तहसीलदार येणार नसतील तर प्रभारींवर ताण येणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची वाटपाची, रस्ता केस अशा प्रकरणाची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.