करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदीत यावर्षी स्पटेंबरच्या शेवटी झालेल्या पावसाने पाणी आले होते. पाणी येताच तरटगाव बंधाऱ्याची व संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे टाकण्यात आली होती. त्यामुळे संगोबा येथील बंधाऱ्याची पाच दारे भरली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र राहिलेली दारेही टाकण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
करमाळा तालुक्यात सीना नदीवर संगोबा, पोटेगाव व तरटगाव हे बंधारे आहेत. हे बंधारे भरल्यास शेतीला पाणी मिळते. मात्र यावर्षी पाऊस लांबल्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत सीना नदी कोरडीच होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
पावसाळ्याच्या शेवटी यावर्षी नदीला पाणी आले. त्यानंतर लगेचच दारे टाकून पाणी अडवण्यात आले होते. त्यामुळे संगोबा येथील बंधाऱ्यात पाच दारे भरली आहेत. या बंधाऱ्यात कान्होळाचेही पाणी येते. हा बंधारा भरल्यानंतर निलज, बोरगाव, पोथरे, पोटेगाव, बाळेवाडी व बिटरगाव श्री येथील शेतीसाठी फायदा होतो. तर तरटगाव बंधारा भरल्यानंतर आळजापूर, जवळा व तरटगाव या गावांना फायदा होतो.
ऍड. शशिकांत नरुटे म्हणाले, संगोबा बंधाऱ्यात सध्या पाच दारे पाणी आले आहे. आणखी चार दारे टाकणे आवश्यक आहे. तीही दारे टाकून बंधारा भरून घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने योग्य नियोजन करून तरटगाव व संगोबा हे बंधारे भरून घ्यावेत, अन्यथा उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा, लागणार आहे.