पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असल्याने शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने चहुकडून केलेल्या घेरेबंदीनंतर पवार यांनी बॅकफूटवर येऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा स्थगित केली नाहीतर मराठा समाज त्यांची यात्रा बंद पाडेन, अशी धमकीच मराठा आंदोलक योगेश केदार यांनी दिली होती. इतरही आंदोलकांनी रोहित पवार यांना यात्रा बंद करण्याचं आवाहन केलं होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर. आर. पाटील, जयदेव गायकवाड व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले, पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक शब्द काढला नाही. मनोज जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे. ते प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहेत. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली. गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात स्वतः सर्वांना भेटलो, तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले.
रोहित पवार यांची संघर्षयात्रा काय आहे?
रोहित पवारांच्या या यात्रेची सुरुवात २४ ऑक्टोबरला शरद पवारांच्या सभेने झाली
२५ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रेने पुण्यातून नागपूरकडे कूच केलं
पुणे ते नागपूर असं ८०० किलोमीटरहून अधिकचं अंतर ही यात्रा ४५ दिवसांत गाठणार
या मार्गावरील जिल्ह्यांमधील युवकांशी संवाद साधून ते प्रश्न जाणून घेणार
बेरोजगारी, दत्तक शाळांच्या निमित्ताने शिक्षणाचे खाजगीकरण, नोकर भरती
शिक्षक भरती अशा अनेक मुद्द्यांना या यात्रेत हात घातला जाणार आहे