करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या तापू लागला असून राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आता काही पक्षाचे पदाधिकारीही आरक्षणामुळे पदाचा राजीनामा देऊ लागले आहेत. करमाळ्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी ‘आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पदाचा राजीनामा दिला आहे.
बिटरगाव श्री येथे हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनात मराठा आरक्षणावर भाष्य करत राजकीय नेते व आमदारांचा समाचार घेतला होता. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलवर हे वृत्त प्रसिद्ध होताच वारे यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. ‘राज्याच्या विधानसभेत मराठा आमदारांची संख्या जास्त आहे. मात्र आतापर्यंत एकाही मराठा आमदाराने आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामा दिला नाही, हे दुर्दैव असल्याचे म्हणत हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सध्य परस्थितीवर भाष्य केले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काहीही केले जाते मग आरक्षणावर तोडगा का काढला जात नाही, असे परखड मत हभप पाटील यांनी कीर्तनात मांडले.
वारे यांच्या पत्नी राणी वारे या जिल्हा परिषदच्या माजी सदस्या आहेत. संतोष वारे यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे येऊन गेल्या होत्या. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर करमाळ्यात सुरु असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होऊन त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यात आता त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी यशपाल कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता वारे यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वारे हे राजकीय पदाचे राजीनामा देणारे करमाळ्यातील पहिले पदाधिकारी आहेत.