करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा (सोलापूर) तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांची बुधवारी (ता. १५) सांयकाळी ७ वाजता सभा होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांनी लढा उभा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील ही सभा ऐतिहासिक होणार असून त्याचे तंतोतंत नियोजन सकल मराठा समाज बांधवांकडून केले जात आहे. करमाळा तालुक्यातील वांगीसह परिसरातील समाज बांधव याचे नियोजन करत आहेत. या सभेच्या ठिकाणी येण्यासाठी करमाळा- टेंभुर्णी महामार्गावरून लोकविकास डेअरी व शेलगाव येथून असे दोन मार्ग आहेत. उजनीच्या बॅकवॊटर परिसरात (भीमा नदीच्या काटावर) ही विराट सभा होणार आहे. करमाळा तालुका सकल मराठा समाजाने येथे कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली असून येथे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त राहणार असून डॉक्टरांचे एक पथक येथे तैनात करण्यात आले आहे.
करमाळा, माढा व इंदापूर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होणारी ही सभा ऐतिहासिक होणार असून साधारण १ लाख समाज बांधव येथे येथील असा अंदाज आहे. १७१ एकरावर या सभेचा मंच आहे. सर्व समाज बांधवांना जरांगे यांचे विचार ऐकता यावेत म्हणून चार स्क्रीन येथे असणार आहेत. कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून ३५ एकरावर येथे पार्किंग करण्यात आले आहे. वाहतूक अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील ऊस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
चार ठिकाणी येथे पार्किंग करण्यात आले असून सभेच्या ठिकाणी समाज बांधवांना व्यवस्थित जाता यावे म्हणून परिसरातील ऊस तोडण्यात आला आहे. त्याशिवाय त्याच शेतात अतिशय तातडीने रस्ता करण्यात आला आहे. या परिसरातील जेसीबी, रोलर व ट्रॅक्टर रात्रंदिवस कार्यरत आहेत. वाहतुकीचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली, असल्याचे सांगण्यात येत आहे.
सभेच्या ठिकाणी व मुख्य ठिकाणी अतिदक्षता म्हणून सहा रुग्णवाहिका, एक अग्निशमन दलाची गाडी तैनात असणार आहे. यासभेवर १० सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. येथे डॉक्टरांचे पथक कायम राहणार असून १२ हॉकीटॉकीच्या माध्यमातून सर्व समनव्यक एकमेकांच्या संपर्कात राहणार आहेत. १००० स्वयंसेवक येथे कार्यरत आहेत. याशिवाय विविध समाज बांधवही सभेत योगदान देत आहेत. इंदापूर येथे ज्या मंडपवाल्याने जरांगे यांच्या सभेचे काम पाहिले होते त्यांनीच हे काम घेतले असल्याने कोणतीही उणीव राहणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फक्त वांगीच नाही तर संपूर्ण परिसर लागला कामाला…
मनोज जरांगे यांची वांगी नंबर १ येथील सभा ऐतिहासिक करण्यासाठी फक्त वांगीच नाही तर परिसरातील सर्व गावे कामाला लागली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणावरून येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होणार नाही याची ते दक्षता घेत आहेत. सर्व हेवेदावे बाजूला सारून फक्त समाजासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. हा विषय समाजाचा व तालुक्याचा असून यामध्ये सर्वजण योगदान देत आहेत.