वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील पहिलीच सभा असल्याने मोठी उत्सुकता लागलेली आहे. उजनी धरणाच्या कुशीतील ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा अंदाज आहे.
सकल मराठा समाज करमाळा तालुकाच्या वतीने होणाऱ्या या सभेत मोठ्याप्रमाणात समाज बांधव उपस्थित राहतील. त्यात नियोजनासाठी कोणतीही कमतरता राहणार नाही. यावर सध्या लक्ष दिले जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वांगी परिसरातील सर्व गावांमधील समाज बांधव ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
सभेसाठी येणाऱ्या बांधवाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने देवळाली येथे सभेला येणाऱ्या बांधवांची मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सभेच्या ठिकाणी पार्किंग व रस्त्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.