करमाळा (सोलापूर) : मनोज जरांगे यांची करमाळा तालुक्यात वांगी नंबर १ येथे होणाऱ्या सभेला बाहेरगावच्या पाहुण्याची देखील मोठी गर्दी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी उभारलेल्या लढ्यात सहभागी होता यावे आणि जरांगे यांचे प्रत्यक्ष विचार ऐकता यावेत म्हणून वांगी येथे उत्स्फूर्तपणे अनेक पाहुणे देखील आले आहेत.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. मात्र सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांनी राज्यात संवाद दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याचा तिसऱ्या टप्यातील आजचा (बुधवारी) पहिला दिवस आहे. त्यात वांगी येथे त्यांची सभा होत आहे. या सभेला महिला व पुरुषांची मोठी गर्दी होणार आहे.
वांगी येथील सासरी असलेल्या अनेक मुली खास जरांगे यांच्या सभेसाठी आल्या आहेत. त्याशिवाय अनेक पाहुणे देखील या सभेसाठी आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे, अशी भावना समाज बांधवांची आहे. वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता जरांगे यांची सभा होणार आहे. भीमा नदीच्या काटावर (उजनी धरणाच्या कुशीत) वांगी १ येथे १७१ एकरावर ही सभा होणारअसून ३५ एकरावर पार्किंग असणार आहे.