करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील साडे येथे एका घरात एकटी महिला पाहून भर दुपारी घुसून 82 हजाराचा ऐवज लंपास केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीला गेलेल्या एवजांमध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मुलांच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याप्रकरणात 30 ते 40 वर्षाच्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
साडे येथील शेख वस्तीवरील युसूफ निजाम शेख यांनी यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी शेख हे कामानिमित्त घोटी येथे गेले होते. वडील कामानिमित्त वालवड येथे गेले होते. तीन बोकड विक्री करून आलेले २० हजार रुपये त्यांनी घरामध्ये ठेवले होते. त्यांच्या आई या नेहमीप्रमाणे शेळ्या सांभाळण्यासाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या पत्नी घरी एकटीच होती. साधारण सव्वाबारा वाजताच्या सुमारास घरामध्ये अनोळखी व्यक्ती चोरीसाठी घुसली. घरातील बेडरूममध्ये मुलीला झोपवून पत्नी हॉलमधील फारशी पुसत होती. तेव्हा त्यांनी हॉलचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्याचा फायदा घेऊन अचानक एक व्यक्ती दरवाज्यातून आत आला. तेव्हा पत्नीने बेडरूममध्ये पळत जाऊन आतून दरवाजा बंद केला. व पतीला याची माहिती दिली. पती घरी आल्यानंतर त्यांनी हॉलमधील सुटकेस व लोखंडी कपाट पाहिले तेव्हा त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य चोरट्याने लंपास केले असल्याचे दिसले.