सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1) (ई), 13 (2) सहकलम भारतीय दंड संहिता कलम 109 तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 2018 चे कलम 13 (1) (ब), 13 (2) सहकलम 12 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे (सोलापूर) पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी किरण अनंत लोहार (वय 50 वर्ष, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर), त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार (वय 44), मुलगा निखिल किरण लोहार (वय 25, सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी गैरमार्गाने संपत्ती जमाकेल्याद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी 15 नोव्हेंबर 1993 पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अपसंपदा टक्केवारी 111.93 टक्के जमा केली आहे.
किरण लोहार यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 किमतीची अपसंपदा संपादित केल्याचे व त्यांची पत्नी सुजाता व मुलगा निखिल यांनी त्यांना गैर मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे परिक्षेत्रचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कुंभार यांनी केले आहे.