करमाळा (अशोक मुरूमकर) : शुक्रवार म्हटलं की करमाळ्यातील गृहिणींची पाऊले वळतात ती आठवडी बाजाराकडे! मात्र आज (शुक्रवार) ताजी लुसलुशीत हिरवीगार शेतातील भाजी घेण्यासाठी गर्दी झाली ती नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर नगरपालिका सेंट्रल स्कूल मुले नं. १ शाळेच्या प्रांगणात. निमित्त होते ते ‘बालगोपाळांच्या आंनद बाजार’चे! तब्बल चार वर्षांनी या शाळेत चिमुकल्यांचा तिसरा आंनदी बाजार भरवण्यात आला होता. त्याला पालकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला.
फक्त पुस्तकी नाही तर त्यांना व्यहवारिक ज्ञानही व्हावे म्हणून या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेतील विद्यार्थी हे आपले कुटुंब मानून या शाळेतील शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याला स्थानिक पदाधिकारी व पालकही प्रोत्साहन देतात. या शाळेत कार्यरत १२ शिक्षक आहेत. साधारण ४०० ची पटसंख्या असलेली ही शाळा आहे. दोन दिवसांपूर्वीच येथे अनोखे विज्ञान प्रदर्शन झाले होते. त्यानंतर आज बालगोपाळांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता.
आपल्याला चांगल्या ठिकाणी जागा मिळावी आणि जादा विक्री व्हावी म्हणून सकाळपासून विद्यार्थ्यांची लगबग दिसत होती. कोणी मेथी, कडीपत्ता, शेपू- चुका, तर कोणी टोमॅटो, वांगी, बटाटे घेऊन विक्रीसाठी बसले होते. आठवडी बाजारात जेवढ्या भाज्या मिळतात तेवढ्या भाज्या घेऊन चिमुकले विक्रीसाठी बसले होते. फक्त भाजीपालाच नाही तर येथे खवय्यांसाठी खाऊगल्ली देखील होती. वडापाव, भेळ, शंभू वडा, चहाचा देखील येथे स्टॊल होता. शिक्षकांच्या कल्पनेतून भरवण्यात आलेल्या या बाजारात हवं ते मिळत होतं. दहा वाजता हा बाजार सुरु झाला होता. आपला चिमुकला कशी विक्री करतो हे पालक कुतूहलाने पहात होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा माने म्हणाल्या, ‘माझ्या सेवेला ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. मला आजार असतानाही शाळेत पाऊल ठेवल्यानंतर मी सर्व विसरून मुलांमध्ये रमून जाते. कोरोना कालावधीपूर्वी सलग दोन वर्ष येथे बालगोपाळांचा आंनदी बाजार भरला होता. त्यानंतर यावर्षी आंनदी बाजार भरविण्यात आला आहे. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले’. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘या बाजारात पालकांचाही उत्स्फूर्तपणे सहभागी होता. काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात मात्र त्यांना व्यहवारीक ज्ञान कमी असते तर काही विद्यार्थी अभ्यासात कमी आणि व्यहवारीक ज्ञान जास्त असते. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व कष्टाने पैसे कसे कमवावेत हे समजावे म्हणून हा बाजार भरवला जातो.’, असेही त्या म्हणाल्या. या बाजाराला यशकल्याणीचे गणेश करे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने या बाजाराची सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई खाटेर, मोक्षा खाटेर यावेळी उपस्थित होत्या.
फोटो सेशन…
शाळेत भरवण्यात आलेल्या बालगोपाळांच्या बाजारात पहिलीपासून पाचवीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आपला चिमुकला न लाजता कशी विक्री करतो हे पहात अनेक पालकांनी त्यांचे फोटोही काढले. आपल्या मुलाकडून खरेदी करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांनेच आणि ग्राहकांचे व शिक्षकांचे फोटो पालकांनी काढले.
बाजारात खुली स्पर्धा…
आठवडी बाजार म्हटले की सर्वात जास्त विक्री व्हावी म्हणून प्रयत्न केला जातो. आपल्याकडे भाज्यांचा दर किती आहे आणि ग्राहक आकर्षित व्हावा म्हणून विक्रेता ओरडून सांगत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपली भाजी विकावी म्हणून विद्यार्थी ग्राहकाला आकर्षित करत असल्याचे दिसले. या बाजारात भाज्यांची विक्री व्हावी म्हणून दराची खुली स्पर्धा असल्याचेही दिसले.
यांनी घेतले परिश्रम…
बालगोपाळांचा आंनदी बाजार यशस्वी व्हावा म्हणून शिक्षक लालासाहेब शेरे यांच्यासह शिक्षिका अश्विनी ठाकरे, सुषमा केवडकर, धनश्री उपळेकर, मंगल गलांडे, वैशाली जगताप, सुनीता भैलुमे, अशा अभंगराव, सुनीता शितोळे आदींनी परिश्रम घेतले.