करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात नेमकं चालाय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आता पडू लागला आहे. कर्मचारी अपुरे आणि सर्व्हर डाऊनचे कारण सांगत नागरिकांची निराशा करणाऱ्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेमके कोण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे.
करमाळा तहसील कार्यालयात पुरवठा विभाग हे महत्वाचे कार्यालय आहे. रोज शेकडो नागरिक येथे रेशनकार्ड व आरोग्य मदतीच्या संदर्भात येत असतात. अपवाद सोडला तर आल्याबरोबर काम झाले आणि संबंधित कर्मचारी जागेवर भेटला तर त्या नागरिकाचे नशीब चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे. रेशनकार्डचे संगणकीकरण, नवीन नाव वाढवणे व नाव कमी करणे अशा कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत.
पांगरे येथील एका नागरिकाने ७ ऑक्टोबरला पुरवठा विभागात प्रकरण दाखल केले होते. अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र अजूनही त्यांचे हे प्रकरण झालेले नाही. याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु असून सतत हेलपाटे मारत आहेत. त्यांनाही सर्व्हर डाऊनचे कारण सांगितले जात असून तेव्हापासून सर्व्हर डाऊन असले तर मग संबंधित अधिकारी व कर्मचारी काय काम करत आहेत? हा प्रश्न निर्माण होत असून कामाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
पांगरे येथील अर्ज केलेल्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सर्व्हर डाउनच्या नावाखाली करमाळा तहसीलच्या पुरवठा विभागात नागरिकांची लूट सुरु आहे. एखाद्या प्रकरणाला पैसे दिले की ते काम होते. मात्र तुम्ही पैसे घ्या पण ग्रामीण भागातील नागरिकांचे हेलपाटे का करायला लावता? येथे प्रकरणाची पोहोच देणारा पण पैसे घेतोय, मी त्यांना स्वतः विचारलं का पैसे घेतो तर तो म्हणतो मी रिटायर माणूस आहे. येथे कोण माणूस नाही म्हणून मी काम करतो म्हणून मी पैसे घेतो. सध्या या विभागात प्रचंड लबाडी सुरु असून त्या विभागात कोणच लक्ष देत नाही.’