सोलापूर : मकाजी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलाबाबत आंदोलनकर्ते प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, ऍड. राहुल सावंत, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची एकत्रित बैठक झाली आहे. या बैठकीत २५ जानेवारीपर्यंत बील दिले जाईल, असे आश्वासन बागल यांनी दिले आहे. दरम्यान प्रशासनाकडून कारखान्याला कर्ज देण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता २५ तारखेपर्यंत बील मिळणार का? हे पहावे लागणार आहे.
कारखान्याचे संचालक सतीश नीळ, धनंजय डोंगरे आदी उपस्थित होते. मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकीत ऊस बिल आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे. या बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी २२ जणांना नोटीस दिली होती. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
२५ तारखेपर्यंत कारखान्याकडून थकीत बिल दिले जाईल, असे यावेळी कारखान्याकडून सांगण्यात आले. तर काय अडचण आल्यास प्रशासकीय स्तरावरून मदत केली जाईल, असे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रादेशिक सह संचालक (साखर), सोलापू, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर, श्री भोसले लेखापरीक्षक, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विभाग नियंत्रक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, विजयकुमार जाधव निवासी नायब तहसीलदार, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, दशरथ कांबळे, ऍड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, शहाजी माने, वामनराव बदे, हरिदास मोरे, गणेश वाळुंजकर, बाळासाहेब गायकवाड, विक्रम दास व प्रा. रामदास झोळ यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.