करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेवर निर्बंध असल्याने ठेवीदारांची गैरसोय होत आहे. ठेवीदारांना गरज असतानाही वेळेत पैसे मिळत नाहीत, त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ठेवीदारांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना सह्यांचे निवेदन दिले आहे.
करमाळा अर्बन बँकेवर साधणार दोन वर्षांपासून आरबीयाचे निर्बंध आहेत. दरम्यान बँकेचे संचालक मंडळीही बरखास्त झाले आणि प्रशासक नियुक्त झाले. मात्र तरीही बँक सुरळीत झालेली नाही. यामध्ये ठेवीदारांची गैरसोय होत असून हक्काचे पैसे मिळावेत अशी मागणी केली जात आहे. अनेक ठेवीदार हे बँकेकडून पैसे मिळत नसल्याने खासगी सावकाराकडून पैसे काढत आहेत. ‘आरबीआय’ने निर्बंध उठवून ठेवीदारांना पैसे देण्याची सूचना प्रशासकांना द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
बँकेचे माजी संचालक चंद्रकांत चुंबळकर म्हणाले, ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजेत. ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत. बँकेवरील निर्बंध उठावेत यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. बँकेचे प्रशासक यांच्या मार्फत त्यासाठी पत्र पाठीवले आहे. निर्बंध उठल्याबरोबर व्यहवार सुरळीत होतील.