करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कौतुक करत लोकसभेच्या उमेदवारीबाबत मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सावध भूमिका मांडली आहे. करमाळा येथे जगताप गटाच्या वतीने सटवाई निवासस्थान येथे आज (मंगळवार) सायंकाळी स्नेह मेळावा घेतला. त्यात माजी आमदार जगताप यांनी उमेदवारीबाबत सावध वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या इच्छुकांचे दौरे वाढले आहेत. भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील व खासदार निंबाळकर यांची उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार जगताप यांनीही ‘दोघांचे मिटत नसेल तर मला उमेदवारी द्या’, असे म्हणत इच्छा व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आदिनाथ करखान्याबाबत आकलूज येथे करमाळा तालुक्यातील सर्व गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला माजी आमदार जगताप यांच्यासह माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाकडून विलासराव घुमरे उपस्थित होते.
आज करमाळ्यात जगताप गटाचा मेळावा झाला. त्याला खासदार निंबाळकर यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपचे शंभुराजे जगताप यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार जगताप यांनी खासदार निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले. जगताप म्हणाले, ‘खासदार निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा विकास केला आहे. पाणी प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष दिले असून आतापर्यंतचे खासदार येथील नागरीकांना कधी माहितीही होत नव्हते. मात्र निंबाळकर हे सतत नागरिकांच्या संपर्कात राहून विकास कामे करत आहेत.’ असे सांगत असतानाच खासदार निंबाळकर यांना उद्देशून जगताप म्हणाले, दादा तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.
राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार शरद पवार यांनाही त्यांच्यासमोर मंचावर खरं तेच बोललू होतो. मी सहसा कोणाचे कौतुक करत नाही. मात्र तुम्ही काम केले आहे म्हणूनच मी तुमचे कौतुक करत आहे. पवार यांच्या विरुद्ध काम करत मी सुभाष देशमुख यांचे काम केले होते. येणाऱ्या निवडणुकीतही भाजप ज्याला उमेदवारी देईल त्यांचेच आम्ही काम करणार आहोत. असे म्हणत जगताप यांनी मोहिते पाटील यांच्याबाबत सावध विधान केले आहे.