करमाळा (सोलापूर) : आजारी पत्नीला जिंती येथे रुग्णालयात भेटण्यासाठी घर बंद करून गेल्यानंतर चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत भर दुपारी चोरी केल्याची घटना भिलारवाडी येथे घडली आहे. यामध्ये पतीच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रोख रक्कम व सोने असा २१ हजाराचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे.
भिलारवाडी येथील दादा मुरलीधर खोमणे हे ३१ तारखेला दुपारी १२ वाजता त्यांच्या आजारी पत्नीला जिंती येथील रुग्णालयात भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या दोन्ही मुली सकाळी १० वाजता शाळेत गेल्या होत्या. ते दुपारी १२ वाजता घर बंद करून गेले होते. त्यानंतर मागे ही चोरी झाली आहे. खोमणे हे रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या मुली घरी आल्या तेव्हा घर उघडे असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी वडील दादा यांच्याशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. चोरटयांनी घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. दरम्यान त्याच दिवशी रामवाडी येथेही महादेव पंढरीनाथ गदादे यांच्या घरात देखील चोरी झाल्याचे समजले आहे, असे खोमणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.