करमाळा (अशोक मुरूमकर) : कुणबी नोंदीचे पुरावे सापडल्याने अनेकांनी दाखले काढण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी अर्ज करताना लागणारी ५ रुपयांची तिकिटे मिळत नाहीत. त्यामुळे १० रुपयांचे तिकीट घ्यावे लागत आहे. याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय करमाळा तालुक्यात मोडीचे भाषांतर देखील प्रत्येक दाखल्याला वेगळे करावे लागत असल्याने त्याचा भुर्दंड सोसावा लागत असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले. त्यानंतर अनेक जुन्या नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येक गावात या नोंदी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे दाखले काढण्यासाठी व त्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. त्यात सध्या नागरिकांना ५ रुपयांचे तिकीट मिळत नाही. १०० रुपयांचा स्टँपही ११० रुपयांना दिला जात आहे. यातून नागरिकांची लूट सुरु असून ही लूट थांबवण्याची मागणी केली जात आहे.
सुनील सावंत म्हणाले, मराठा समाजाला जास्तीत जास्त दाखले काढता यावेत यासाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची नावे तहसील कार्यालय येथेही लावण्यात यावीत. त्यावर सही व शिक्का असावा. मोडीचे भाषांतर करण्यासाठी एका दाखल्याला १०० रुपयाचे प्रतिज्ञापत्र घेतले जात असून मोदी वाचक १००० रुपये घेत आहेत. एकाच कुटुंबातील मोडी लिपीतील दाखला असेल तर त्याचे एखादा भाषांतर केल्यानंतर तोच इतर दाखल्यांसाठीही ग्रह धरणे आवश्यक आहे. तिकिटे मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे व नागरिकांची लूट थांबवावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.