करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय माने पाटील, अनुसूचित जाती जमातीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश लोंढे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गाव भेट दौरा सुरु आहे.
पांडे जिल्हा परिषदमधील १४ गावात काॅर्नर सभा, घोंगड्या बैठका संपन्न झाल्या. याच दरम्यान घारगावमध्ये मतदारसंघातील अडीअडचणी व विविध प्रश्नां संदर्भामध्ये उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधताना राष्ट्रीय समाज पक्षाचे करमाळा विधानसभा प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपने यांनी संवाद साधला. पाच वर्षात खासदारांनी जनहिताची तालुक्यातील कोणतीच कामे केलेली नाहीत. लोकसभेत मतदारसंघातील कोणताच मुद्दा पाच वर्षात उपस्थित केला नाही व जनतेत फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये मते मागण्याचा अधिकारच नाही.
देशामध्ये सर्व शासकीय विभाग, शाळा खाजगीकरण व पक्ष फोडा- फोडीतच जास्त रस आहे. शेतकरी मालाला योग्य बाजार, प्रचंड महागाई सुरु असताना यांच्या विरोधात विद्यमान खासदार बोलले नाहीत. गेल्या पाच वर्षांमध्ये चार वेळा उजनी धरणातील पाणी पातळी मायन्समध्ये गेले व पाणी चोरी आणि पाण्याचं नियोजन संदर्भात व कुकडीचे पाणी पूर्ण क्षमतेने गेली पाच वर्षात एकदाही करमाळा तालुक्याला मिळाले नाही हे खूपच वाईट द्रूर्दव्य आहे.
तालुक्यातील साखर कारखानदारांनी शेतकरी वर्गाची ऊस तोडीची आढवणूक व तुटलेल्या उसाला योग्य बाजार भाव कमाई कमलाईची थकीत ऊस बीलाचे काय आणि कधी मिळणार? याचे सुतोवाच निंबाळकरनी का केले नाही? चूकीच्या धोरणामुळे आदिनाथ कारखाना भांडवलदारांच्या घशात जात असताना व कामगारांच्या थकीत पगारी बाबत पाझर का फुटला नाही विद्यमान खासदारांला? करमाळा तालुक्यातील पूर्व 42 गावांसाठी नियोजित असणारी रीटेवाडी उपसा सिंचन योजना पुढे का सरकत नाही. नुसती जहीरातबाजीसाठी खटाटोप खासदार करत आहेत.
पाच वर्षांमध्ये करमाळा ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम सुरू होऊ शकले नाही. या रस्त्यावर खडेच- खडे असल्याने महामार्गावर सुमारे दोनशे लोकांचे बळी गेले या प्रश्नावर सुद्धा संसदेमध्ये कधी बोलले नाहीत. जिल्ह्याची वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये पुणे भागातील एमआयडीसी मधून येणाऱ्या प्रदूषित पाण्यावरती संसदेमध्ये प्रश्न मांडला का? जागतिक दर्जाचे केळी पीक करमाळा तालुक्यामध्ये पिकत असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या निर्यात- आयाथ धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्या करिता का आवाज उठवला नाही? त्यामुळेच भाजपचे व खासदार धोरण हे शेतकरी विरोधी राहिल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन अटळ आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याकरिता आमदार महादेवजी जानकर यांना मतदारसंघातील जनतेने निवडून द्यावे तसेच शनिवार (17 फेब्रुवारी) फलटण येथील राष्ट्रीय समाज पक्षाचा माढा लोकसभा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याने या मेळाव्यास गावोगावातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण गोपने यांनी केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तालुकाध्यक्ष जिवन होगले, जगन्नाथ सलगर, बारामती प्रभारी ऍड. दिलीप धायगुडे, युवक अध्यक्ष कृष्णा कोंढलकर, प्रवीण होगले पदाधिकारी उपस्थित होते.