करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मुद्रांक शुल्क का भरून घेतले जात नाही याचे लेखी कारण द्या’, अशी तक्रार करमाळा येथील एका नागरिकाने केली आहे. करमाळा येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयात आलेल्या नागरिकांची अडवणूक केली जात असून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून दस्त स्वीकारला जात नसल्याची तक्रार केली जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी यामध्ये तक्रारदाराने केली आहे.
याबाबत करमाळा येथील शंकर कांबळे यांनी लेखी तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘जिल्हाधिकाऱ्यांकडे भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग २ करणे व भाडेपट्टाचे नूतनीकरण करण्यासाठी करमाळा येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ येथे अर्ज केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करारनामा निष्पादित करण्याबाबत आदेश दिला आहे. त्या अर्जानुसार कार्यालयात संपर्क साधूनही अर्ज घेतला जात नाही. याबाबत वारंवार सांगूनही मुद्रांकाबाबत सहकार्य केले जात नाही. आपण मुद्रांक शुल्क का भरून घेत नाहीत याचे लेखी कारणही दिले जात नाही,’ असे यामध्ये म्हटले असून यामध्ये नुकसान होणार असून अडवणूक केली जात आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.