करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) करमाळा पंचायत समिती येथे माढा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांनी करमाळा मतदार संघातील सर्व सेक्टर ऑफीसर (क्षेत्रीय अधिकारी) व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सूचना देऊन केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच तालुक्यांतील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल यांना SVEEP बाबत, मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत व महिला मतदार ,नव मतदार वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
करमाळा मतदार संघासाठी एकूण 38 सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली असून निवडणूक विषयक विविध कामाचे नियोजन करण्यासाठी 20 नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूक शांततापूर्ण व व्यवस्थित पार पडण्यासाठी पाच स्थिर पथक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदरचे पथके जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत असणार आहेत सदरचे ठिकाणे कोंढारचिंचोली, कोर्टी, रावगाव, जातेगाव, आवटी या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. याबरोबरच चार भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर पथकामध्ये नेमलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज घेण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका ठाकूर यांनी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत पोलिस अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. शांततापूर्ण मतदान प्रक्रिया पार पडेल याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी चारुशीला देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, तहसीलदार करमाळा शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसिलदार निवडणुक बाबासाहेब गायकवाड, नायब तहसीलदार काझी, तालुका कृषीअधिकारी संजय वाकडे, परमेश्वर ठोकळ, संजय गोरे यांच्यासह सर्व सेक्टर ऑफिसर नोडल अधिकारी मंडळाधिकारी तलाठी, पोलिस पाटील उपस्थित होते.