करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. या विकास कामात कोंढेज येथील खत्री दुकान ते महादेव मंदिर (मठ) रस्ता काँक्रिटीकरण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर यात्रा छबीना मार्ग रस्ता काँक्रिटीकरणचा समावेश आहे. यावेळी गावाकऱ्यांच्या लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या बांधकामचेही भूमिपूजन झाले.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे म्हणाले, सरकारचे विकासाचे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवणे ध्येय आहे. भाजपच्या माध्यमातून आपण हेच ध्येय एक व्रत म्हणुन काम करत आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे, असेही चिवटे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप सोशल मिडीयाचे माढा लोकसभा संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष पै. अफसर जाधव, पांडुरंग बापु लोंढे, कोंढजचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.