करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करत मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा एखादा डावलले आहे. या उमेदवारीचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला असला तरी मोहिते पाटील समर्थकांमध्ये मात्र नाराजी असल्याचे चित्र आहे. काही पदाधिकाऱ्यांनी तर राजीनामा दिला असल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही निवडणूक मोहिते पाटलांच्या अस्तित्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीच रिंगणात उतरून सूत्रे हाती घेण्याची गरज आहे, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी मोहिते पाटील यांचा प्रचंड दबदबा होता. सर्व सूत्रे अकलूज येथील शिवरत्नवरून हलत होती. मात्र काही दिवसांपासून मोहिते पाटील हे बॅकफूटवर जात आहेत. या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. हा दौरा केला असला तरी यावेळी नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळाले, असे चिन्ह दिसत होते आणि शेवटी तसंच झाले. आता मोहिते पाटील काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोहिते पाटील यांनी रिंगणात उतरावे अशी एक मागणी आहे. आणि मोहिते पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्यक असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने त्यांना विधानपरिषद दिली मात्र जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना पाहिजे तसे स्थान दिले नाही असे बोलले जात. त्यांचे कारखानेही पूर्णपणे अडचणीतून बाहेर निघालेले नाहीत. लोकसभेची उमेदवारीही मिळालेली नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातूनच राजीनामा नाट्यही सुरु झाले आहे.
माढा लोकसभा मतदार संघाची पुनर्र्चना झाली तेव्हा म्हणजे २००९ मध्ये या मतदार संघात भाजपकडून सुभाष देशमुख व राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यात लढत झाली होती. देशमुख यांना २ लाख १६ हजार १३७ तर पवार यांना ५ लाख ३० हजार ५९६ मते मिळाली होती. तेव्हा १५ उमेदवार रिंगणात होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील व ‘एसडब्ल्यूपी’कडून (भाजप मित्र पक्षाचीआघाडी) सदाभाऊ खोत हे रिंगणात होते. मोहिते पाटील यांना ४ लाख ८९ हजार ९८९ मते मिळाली होती. तर खोत यांना ४ लाख ६४ हजार ६४५ मते मिळाली होती. तेव्हा नोटासह २५ उमेदवार रिंगणात होते.
मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी सोडल्यानंतर भाजपकडून विधानपरिषद मिळाली. मात्र ते राष्ट्रवादीबरोबर राहिले असते तर महाविकास आघाडीच्या काळात त्यांना कदाचित मंत्रिपद मिळाले असते, अशी चर्चा सुरु आहे. आता लोकसभा निवडणुकीत त्यांनी उतरण्याची गरज आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीत पहाता त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात झालेली फूट यामुळे जनसामान्यात भाजपबद्दल नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या सहानुभूती आहे. अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेल्याने जनसामान्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चा आहेत. अशा स्थितीत मोहिते पाटील काय निर्णय घेतील हे महत्वाचे ठरणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांना मानणारा एक वर्ग आहे. भाजपकडून उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यात मोहिते पाटील यांचे नाव नसल्याचे समजताच अनेकांचे स्टेट्स बदलले होते. ‘आता खासदारच’, ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ अशा गाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांचे फोटो असून धैर्यशील मोहिते पाटील यांचा दयावान असा उल्लेख आहे.