खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी (ता. २७ मार्च) पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो आणि रामराजेंच्या नाराजीवर काय मार्ग काढला जातो हे पहावे लागणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. भाजपने खासदार निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटील रामराजे निंबाळकर नाराज झाले आहेत. भाजपने येथील उमेदवार बदलावा, अशी मागणी आहे. येथील उमेदवार बदलला नाही तर कमी मते पडल्यास आम्ही जबाबदार नाही, असे स्पष्टपणे रामराजे यांनी सांगत नाराजी बोलून दाखवली होती. माढ्याबरोबरच ते नाशिक आणि सातारा जिल्ह्यांतील आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमेवत सवांद साधणार आहेत. २८ तारखेला अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत आमदारांवर तालुक्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.