करमाळा (सोलापूर) : येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या उमरड मंडळ अधिकाऱ्याला २० हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे. यामध्ये करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. शाहिदा युनूस काझी (वय ४२) असून यामध्ये पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
उमरड येथील मंडळ अधिकारी काझी यांनी तक्रारदाराला २५ हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. ‘वारस नोंदीसाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार मागितले होते. त्यावर तडजोड होऊन २० हजार लाचेची मागणी करण्यात आली होती. ही लाच आज (मंगळवारी) जेऊर येथे असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय येथे साकारताना संशयित आरोपीला पकडण्यात आले.
या कारवाईसाठी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सोलापूर येथील पोलिस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिले. तर पोलिस अंमलदार स्वीमराव जाधव, पोलिस नाईक अतुल घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला, शाम सुरवसे आदींनी सापळा लावून ही कारवाई केली आहे.