करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. मोहिते पाटील यांचा सध्या करमाळा दौरा सुरु आहे. निंभोरे, वरकाटणे येथे भेटी देऊन आल्यानंतर ते करमाळ्यात आले होते. त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांचीही भेट घेतली आहे.
मोहिते पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वाटेवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत; त्यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी मतदारसंघात दौरा केल्यानंतर त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा आग्रह समर्थक करत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची शरद पवार गटाने उमेदवारीही जाहीर केलेली नसल्याने येथे उत्सुकता वाढलेली आहे. त्यात मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीची उद्या (रविवारी) तिसरी यादी जाहीर होणार असून त्यात माढा मतदारसंघाचा समावेश असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
मोहिते पाटील हे ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवतील का? पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. माजी आमदार जगताप व मोहिते पाटील यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही. तेथील भेटीनंतर ते भाजपचे शहराध्यक्ष अग्रवाल यांच्या भेटीला आले होते. अग्रवाल हे खासदार निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र मोहिते पाटील व त्यांचेही पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, आबासाहेब टापरे, श्री. तनपुरे, अजित तळेकर आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान शहराध्यक्ष अग्रवाल म्हणाले, भाजपच्या उमेदवाराचा आपण प्रचार करत असून वरिष्ठांच्या आदेशाने काम सुरु आहे. येथून आम्ही मताधिक्य देणार आहोत.