करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक, त्यानंतर गणनिहाय बैठका घेऊन आता गावभेट दौरा सुरु केला आहे. दिवसभरात पश्चिम भागातील २२ गावाला त्यांनी भेट दिली असून प्रचारादरम्यान जेवणही त्यांनी भर रस्त्यात एका झाडाखाली कार्यकर्त्यांबरोबर जेवण करत साधेपणा दाखवत कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत.
खासदार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शिंदे यांनी काल (शनिवार) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील 22 गावांना भेटी दिल्या आहेत. पारेवाडी येथून सकाळी ८ वाजता या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर केतूर नं.1, केतुर नं.2, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव, हिंगणी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, दिवेगव्हाण, सावडी, कोर्टी, विहाळ, वीट या गावांना भेट देऊन करमाळा येथे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन साधारण पावणेदहा वाजताच्या दरम्यान दौऱ्याचा समारोप झाला.
सकाळी सुरु झालेल्या या दौऱ्यात जेवणासाठी वेळ राखीव नव्हता. किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला याची कल्पना देण्यात आली नव्हती. जिंती जवळ आल्यानंतर पारेवाडी येथील आमदार शिंदे यांचे समर्थक नितीन शिंदे हे स्वतः आमदार शिंदे यांच्यासह १० कार्यकर्त्यांचा साधा जेवण डबा घेऊन आले होते. याची माहिती आमदार शिंदे यांना झाल्यानंतर जिंती फाटा येथे दत्ता गायकवाड यांच्या शेतात झाडाखाली बसून त्यांनी जेवण केले. भेंडी, चपाती, तांदुळशाची भाजी, शेंगा चटणी, लोणचं, काकडी व कांदा असा हा डबा होता. आमदार शिंदे यांच्यासह सुहास गलांडे, राजेंद्र धांडे, सुर्यकांत पाटील, बाळकृष्ण सोनवणे, मनोहर हंडाळ, तानाजी झोळ, सुजित बागल, डॉ. विकास वीर, तुषार शिंदे, सूरज ढेरे या कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी जेवण केले. त्यानंतर पुढील प्रचारासाठी आमदार शिंदे हे रवाना झाले. त्यांच्या या साधेपणाची परिसरात जोरदार चर्चा आहे.