करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची केंद्र सरकारच्या नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. व्दिपक्षीय व्यापारस चालना देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वतीने नेदरलँड व बेल्जियम देशातील व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळात केळी निर्यातदार व्यापारी प्रतिनिधी म्हणून ही निवड झाली आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स, ( FIEO) या भारतातील एक सर्वोच्च व्यापार प्रोत्साहन संस्थेच्या वतीने नेदरलँड्स आणि बेल्जियमसोबत द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी, FIEO नेदरलँड आणि बेल्जियममधील भारतीय दूतावासाच्या पाठिंब्याने भारत सरकार नेदरलँड्समध्ये अन्न आणि कृषी क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ पाठवत आहे आणि त्यानंतर बेल्जियम येथे एक दिवसीय बैठक होणार आहे.
भेटीदरम्यान, शिष्टमंडळ ॲमस्टरडॅम आणि रॉटरडॅम येथे डच कंपन्यांशी बैठका घेईल, ज्यांचे समन्वय ट्यूलिप मार्केटिंग कंपनी, रॉटरडॅम करत आहे. भारतीय केळीला या देशात निर्यातीस संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या चर्चेत सहभागी घेण्यासाठी विष्णू सतीश पोळ, मेसर्स सनरिया ॲग्रो प्रोड्यूस कंपनीचे उपाध्यक्ष प्रतिनिधी म्हणून सहभागी होत आहेत. पोळ शेटफळ तालुका येथील रहिवासी असून सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत कृषी व्यवसाय अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर नोकरी न करता शेटफळ येथे लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून केळी निर्यात क्षेत्रात प्रारंभ केला. यानंतर जळगाव येथील अमोल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी कुटुंबातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन सोबत सनरिया ॲग्रो ही निर्यात क्षेत्रात काम करणारी कंपनी स्थापन केली.
सध्या या कंपनीच्या वतीने विविध देशांमध्ये केळी निर्यात केली जात असून अल्पावधीमध्ये या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. दखल घेत भारत सरकारच्या वतीने स्थापित फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने त्यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल शेटफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनी व शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी वैभव गव्हाणे, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे, वैभव पोळ, महावीर निंबाळकर, गजेंद्र पोळ, अनिल पोळ उपस्थित होते
विष्णू पोळ (उपाध्यक्ष सनरिया ॲग्रो बनाना एक्सपोर्ट कंपनी) सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळी उत्पादन होते परंतु ठराविक अखाती देशातच त्याची निर्यात होते या देशातील व्यापार धोरणात बदल झाल्यास केळी निर्यातीवर व केळी दरावर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्याचे नुकसान होते ते टाळण्यासाठी इतर देशातही केळी निर्यात संधी शोधण्याची गरज असून यासंदर्भात नेदरलँड व बेल्जियम या देशात जाणाऱ्या व्यापारी शिष्टमंडळात माझी निवड झाल्या असून भविष्यात या देशात केळी निर्यात तीस चालना मिळण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.