पुणे वन्यजीव विभाग, मुंबई ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन व राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त जंगल अभियानांतर्गत’ भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये पर्यटकांनी फेकून दिलेल्या विविध प्रकारच्या प्लास्टिक कचऱ्याचे एकत्रीकरण केले. भारतातील अनेक प्रकारच्या जैवविविधतेपैकी संवेदनशील असणारी भीमाशंकरची जैवविविधता आहे. त्या जैवविविधतेचे संगोपन करण्याच्या प्रयत्न केला.
या एक दिवसाच्या प्लास्टिक मुक्त जंगल अभियानामध्ये ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे संस्थापक विक्रम यदे, योगेश क्षत्रिय तसेच त्यांचे सर्व स्वयंसेवक, वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर जिल्हा समन्वयक व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील प्रकल्प अधिकारी प्रा. लक्ष्मण राख, शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथील प्रकल्प अधिकारी पांडुरंग शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज सांगोलाचे प्रकल्प अधिकारी संतोष राजगुरू व जुलेखा मुलाणी, शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे येथील प्रकल्प अधिकारी विठ्ठल वलेकर, काशिलिंग शेळके तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
या अभियानामध्ये भीमाशंकरच्या दर्शनासाठी आलेले भाविक व पर्यटक यांनाही सहभागी करून घेतले. आजूबाजूच्या मानवी संचार असणाऱ्या परिसरातून जवळजवळ चार ते पाच टन प्लास्टिक कचरा गोळा केला व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. प्लास्टिकचा कचरा चारशे ते साडेचारशे वर्षे कुजत नाही व त्याचा मातीमध्ये विषारी अंश राहतो जमीन नापीक बनते. प्राणी प्लास्टिक खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तसेच पक्षांच्या सुद्धा प्रजनन क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो.
कालांतराने हा कचरा पाण्यामध्ये मिसळून पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचा अंश मिसळतो पर्यायाने मानवी आरोग्यावर व जैवविविधेवर त्याचा वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टीचा विचार करता हा प्लास्टिक कचरा पृथ्वीसाठी व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीवासाठी किती घातक आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. याचे गांभीर्य आपण नाही जाणून घेतले तर भविष्यात पृथ्वी म्हणजे एक कचऱ्याचा फार मोठा ढिगारा बनेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अभियानाच्या शेवट सर्व स्वयंसेवकांना ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, मुंबई यांचे वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऑर्गनायझेशनचे संस्थापक यंदे यांनी सर्व कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक यांचे स्वागत केले व योगेश क्षत्रिय यांनी आभार मानले.
वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्त परिसर जनजागरण मोहीम
5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनाचे अकराशे स्वयंसेवक व 19 प्रकल्प अधिकारी यांचे वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्त महाविद्यालय व परिसर याविषयी जनजागरण करण्याचा मानस आहे.