करमाळा (सोलापूर) : महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सौजन्याने बाल विवाह मुक्त भारत आणि बाल कामगार मुक्त भारत अभियानाच्यानिमित्ताने मौलालीमाळ परिसरामध्ये बैठक झाली. महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, भटके विमुक्त जाती व अदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण माने, प्रदीप साळुंखे, उमेश गायकवाड उपस्थित होते.
मदारी समाज बांधवांना यावेळी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. मुलाचे वय २१ तसेच मुलीचे वय १८ होईपर्यंत त्यांचा विवाह करु नये, बाल कामगार म्हणून मुलांना पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी मदारी समाजातील नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.
झिंजाडे म्हणाले, विकास होण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. आपल्यातील कौशल्याचा उपयोग करुन योग्य मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. माने म्हणाले, मदारी समाजातील मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बाल विवाहामुळे समस्या उद्भवतात त्यामुळे बाल विवाह करु नयेत. तसेच अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा यातून बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी मदारी समाजातील बिलाल मदारी, नजीर मदारी, असलम मदारी, सलीम मदारी, दस्तगीर मदारी, उंबर मदारी, मेहबूब मदारी, उस्मान मदारी, हिमाम मदारी आदींसह मदारी समाजातील पुरुष, महिला व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.