पुणे : लिला पुनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) आपल्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त सहा शहरांतील १ हजार ५०० हून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित पण गुणवान मुलींना गुणवत्तासह गरजू आधारित शिष्यवृत्त्या प्रदान केल्या. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर तसेच तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटकमधील बेंगळुरू यांचा समावेश आहे.
२०२४- २५ या शैक्षणिक वर्षात, एलपीएफने अभियांत्रिकी, नर्सिंग आणि विज्ञान क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १ हजार २०० हून अधिक मुलींना त्यांच्या संपूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या. याशिवाय, ‘टूमॉरो टुगेदर’ या शालेय प्रकल्पाअंतर्गत पुणे विभागातील ७ वी पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जवळपास ३०० मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आल्या.
या शिष्यवृत्ती प्रदान समारंभाचे आयोजन १३ वेगवेगळ्या कार्यक्रमांत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एलपीएफच्या अध्यक्षा श्रीमती लिला पुनावाला – अध्यक्ष , श्री. फिरोज पुनावाला – संस्थापक विश्वस्त, कॉर्पोरेट भागीदार, दाते आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या.
संस्थेच्या स्थापनेपासून आजवर एलपीएफने १७ हजार ३०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती प्रदान केल्या असून त्यामुळे सशक्त महिलांचे एक विस्तारित समुदाय निर्माण झाले आहे. पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे उपस्थित असलेल्या या संस्थेने शिक्षण आणि सशक्तीकरणाचा प्रवास सुरू ठेवला आहे. एलपीएफ पुढील वर्षी आपला ३०वा वर्धापन दिन साजरा करणार असून या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त संस्थेने २० हजार मुलींना सशक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून तरुण आयुष्ये बदलण्याच्या आपल्या ध्येयाशी एलपीएफ दृढपणे बांधिल आहे.