करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयातही बदल्या झाल्या आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी हे बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून संतोष गोसावी यांची बदली नव्याने झालेल्या जिंती मंडळात मंडलाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
याशिवाय अनिल ठाकर यांची जेऊर मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अर्जुननगरचे मंडळ अधिकारी सादिक काझी यांची कोळेकर यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. जेऊरचे मंडळ अधिकारी रेवणनाथ वळेकर यांची अर्जुननगर मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. हनुमंत जाधव यांची तहसील कार्यालयातच दुसऱ्या विभागात बदली झाली आहे. निवडणूक शाखेतील हनुमंत कोळेकर यांचीही बदली झाली आहे. कोळेकर यांची माळशिरस तालुक्यात बदली झाली आहे.
गोसावी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवेढा तालुक्यातील भोसेचे मंडळ अधिकारी नागनाथ जोध यांची बदली झाली आहे. यु. एन. बागवान यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर सुहास वाकुडे यांची बदली झाली आहे.