(अशोक मुरूमकर) लोकशाहीत विरोधी पक्षाला खूप महत्व आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करत असतो. त्यासाठी विरोधी पक्षनेता महत्वाचा असतो. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामावर त्याचे लक्ष असते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे विरोधी पक्षनेते फोडण्यात भाजपला यश आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची यामध्ये खेळी यशस्वी झालेली दिसते. पहिल्यांदा एकनाथ शिंदे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आता अजित पवार हेही फुटले आहेत.
२०१४ पासून राज्यातील राजकारणात सतत वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ऐनवेळी स्वतंत्र्य लढले होते. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने ते वेगळे लढले परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांच्या एका विधानाने (सरकारला बाहेरून पाठींबा देऊ) पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाली होती. मात्र शिवसेना सत्तेत गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. तेव्हाही फडणवीस यांची चाणक्यनीती यशस्वी झाली होती. (शिवसेनेचे मंत्री तेव्हा खिशात राजीनामे घेऊन फिरत होते.)
त्याच पाच वर्षात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शिंदे हे सत्तेत गेल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आले. मात्र काही महिन्यातच विखे पाटील यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी फोडले होते. त्यानंतर विखे पाटील यांच्याकडेही मंत्रिपद आले होते. त्यानंतर राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना व भाजप एकत्र लढले. मात्र निकालानंतर पुन्हा ते विभक्त झाले.
२०१९ च्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून बिनसले आणि एकमेकांचे विरोधक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. तेव्हा सर्वाधिक जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यात देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते झाले.
२०२२ मध्ये पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून मुख्यमंत्री झाले. तेव्हा विरोधी पक्षाची माळ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गळ्यात आली. मात्र वर्षभरातच पुन्हा विरोधीपक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा शिंदे त्यानंतर विखे पाटील आणि आता पवार या तीनही विरोधी पक्षनेत्याना फोडण्यात भाजपला यश आले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.