करमाळा (सोलापूर) : पोलिस अधिकारी व अंमलदार यांना 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क राहावे लागते. त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण, पाणी व झोप मिळत नाही. रात्रंदिवस कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते. ‘बीपी’ व ‘शुगर’ असे विविध आजार उद्भऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यातूनच पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे व व्यवस्थित कर्तव्य बजावता यावे म्हणून करमाळा उपजिल्हा रुग्णालयच्या वतीने पोलिसांसाठी आज (बुधवार) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये पोलिसांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ‘सीबीसी, ‘एलएफटी’, ‘केएफटी’, ‘एचबीएवनसी’, ‘एचआयव्ही’, ‘व्हिडीआरएल’ व ‘टीएफटी’ तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबिर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, असे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले.
आरोग्य शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गजानन गुंजकर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद खोबरे, समुपदेशक कपिल भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वरी पाटील, अनिता जगताप आदींनी परिश्रम घेतले.