करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी येथे बिबट्या दिसल्यानंतर घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे. मांगीत ज्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तेथे हा पिंजरा लावण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार हा पिंजरा लावण्यात आला असल्याचे वनविभागाचे एस. आर. कुरले यांनी सांगितले आहे. या पिंजऱ्यात कोंबडी ठेवण्यात आली आहे. येथे पाच जणांची बिबट्या नियंत्रण माहिती कक्ष स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गणपत जाधव, नारायण चव्हाण, सोमा भोसले, तानाजी खरात व गजानन तोरमल यांचा यामध्ये समावेश आहे. वनपाल बाळासाहेब लटके यांच्या व कुरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष आहे.
युवा सेनेचे जिल्हा सचिव आदेश बागल म्हणाले, मांगीसह परिसरात जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवा अशी मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी मांगीत गट नंबर ५ येथे सचिन बागल यांच्या शेतातील रस्त्यावर पिंजरा बसवण्यात आला आहे. यावेळी किरण बागल, दीपक बागल, विनोद नरसाळे, पोलिस पाटील आकाश शिंदे, रोहित राऊत, ऍड. विश्वजीत बागल, प्रवीण भांडवलकर, विकास जाधव, आण्णा राऊत, समाधान कांबळे, आशुतोष बागल, दादा कोळी आदी उपस्थित होते.