करमाळा (सोलापूर) : उजनी धरणावरती सोलापूर, पुणे आणि अनगर या ३ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य धरणातील पाण्यावरती अवलंबून असते. टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेती पंप तसेच पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा हा कमी करण्यात आला होता. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, आमदार जयकुमार कोरे, सोलापूर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी भेट घेतली आहे.
उजनीच्या परिसरातील विजेची समस्या त्यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
आमदार शिंदे म्हणाले, उजनी धरनाच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी बारमाही पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली असून त्यासाठी किमान ८ तास वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. सदर वीज पुरवठा कमी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून शेतकरी संकटात सापडणार आहे. सदर बाब लक्षात घेऊन शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापुढे ही समस्या मांडली असून लवकरच सोलापूर, नगर आणि पुणे या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन यावरती तोडगा काढू असे आश्वासन फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
शेतीसाठी ८ तास वीज पुरवठा व्हावा, भीमा नदी बंधाऱ्यावरील पाणीपुरवठा योजनांना होणारा वीज पुरवठा, ग्रामीण तसेच शहरी भागातील टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा याविषयी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.