करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कसाब गल्ली येथील बद्रुद्दीन हाशम बागवान (वय ६२) यांचे हज यात्रेसाठी गेल्यानंतर पवित्र मक्का शरीफ येथे निधन झाले आहे. ते सेवानिवृत्त एसटी बसचे वाहक होते. त्यांची पत्नी व डॉ. बागवान यांच्या कुटुंबातील सदस्य त्यावेळी बरोबर होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कर करण्यात आले आहेत. पाच दिवसांपूर्वी ते करमाळ्यातून रवाना झाले होते.
इस्लाम धर्मात हज यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी, असे धर्मग्रंथात सांगितलेले आहे. यामुळेच दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी मक्का शरीफ व मदिना शरीफ येथे जातात. बागवान हे पहिल्या फेरीत गेले होते. बद्रुद्दीन बागवान यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.