करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथे एका दुचाकीच्या खोपडीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भलामोठा नाग शिरला. या नागाला येथील पत्रकार गजेंद्र पोळ यांनी सुखरुपणे बाहेर काडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे. शेटफळ येथे सापाला कोणीही मारत नाही. नागोबाचे शेटफळ अशी या गावाची ओळख आहे. या गावात एक नाग सर्वांसमोर दुचाकीच्या खोपडीत जाऊन बसला. मात्र तो काही केल्या बाहेर निघेना शेवटी त्याला काठीवर घेतले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
याबाबत पत्रकार पोळ म्हणाले, ‘शेटफळ गावाची ओळखच नागोबाचे शेटफळ अशी आहे. नागनाथ हे ग्रामदैवत असल्याने येथे घराघरात नागांचे मुक्तपणे वास्तव्य असते. दारात, घरात अंथुरनात नाग असतात. परंतु त्यांना कोणी मारत नसल्याने त्यांना लोकांची भिती वाटत नाही.
तेही आमच्यावर चाल करत नाहीत. सध्या गावातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आसल्याने आशा अडचणीच्या जागी तर त्यांचे वास्तव्य नक्की असतेच. पण आज दुपारी घरी विश्रांती घेत असताना बाहेर नागराजाचे दर्शन झाले. तो थेट मोटारसायकलच्या खोपडीतच गेला. वातावरण उष्ण असल्याने नागराजांना काही केल्या बाहेर येऊ वाटत नव्हते. परंतु त्याला काही वेळानंतर बाहेर काढण्यात यश आले. गावातील मंदीराजवळील त्यांच्या नावे सात बारा असलेल्या ठिकाणी सोडले, असे त्यांनी सांगितले आहे.