करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मोहिते पाटलांनी फक्त घरात नकाशे लावले. मात्र विकास केला नाही. आम्ही जिल्ह्याचा विकास केला असे म्हणता तर मग चिखलठाणचा रस्ता का झाला नाही?’ असा सवाल भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. या रस्त्याला आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेनंतर हे काम सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी चिखलठाण येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट), रासप, रयत क्रांती, आरपीआय (ए) च्या कार्यकर्त्यांची सभा झाली. आमदार संजयमामा शिंदे, महेश चिवटे, गणेश चिवटे, राजेंद्र बारकुंड, चंद्रकांत सरडे, अर्जुन गाडे, प्रियांका गायकवाड, दिनकर सरडे, सुजित बागल आदी यावेळी उपस्थित होते.
चिखलठाण ते जेऊर हा रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला जात आहे. खासदार निंबाळकर म्हणाले, भाजपकडून देशात विकास सुरु आहे. चिखलठाण रस्त्याचा प्रश्नही आमदार शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेतृत्व आम्ही केले विकास केला असे सांगत आहेत. मात्र त्यांना चिखलठाणचा रस्ता करता आला नाही, असे म्हणत टोला लगावला आहे. दुहेरी जलवाहिनी झाल्यानंतर उजनीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागेल हे काम लवकर करून घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे, असेही निंबाळकर म्हणाले आहेत. प्रास्ताविकमध्ये बारकुंड यांनी तर सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.