करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनकर्ते व कारखाना प्रशासन यांची आज (शुक्रवारी) स्वतंत्र बैठक झाली. यावेळी सत्ताधारी बागल गटाचे कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल व कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे हे उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला असून येत्या सोमवारी त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तोपर्यंत करमाळा तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

मकाई कारखान्याने शेतकऱ्यांचे गेल्यावर्षीचे ऊस गाळप बिल थकवले असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज तहसील कार्यालयासमोर ‘थू- थू’ आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनपूर्वीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आंदोलनकर्ते व कारखाना प्रशासन यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीला करमाळ्याचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, प्रा. झोळ, पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान ‘आमची बैठक झाल्यानंतर आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, कारखान्याचे श्री. बनसोडे, कारखान्याचे अध्यक्ष भांडवलकर, नवनाथ बागल यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली’ असे प्रा. झोळ यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आमचा पूर्ण विषय एकुन घेतला आहे. प्रशासनाकडून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्याना दिली आहे. आंदोलनकर्त्यांची व कारखाना प्रशासनाची स्वतंत्र बैठक झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 25 डिसेंबर 2023 पर्यंत बिले मिळतील, असे सांगितले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे प्रा. झोळ यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *