बॉलिवूड अभिनेत्री काजोल चक्क लोकप्रिय मालिकेत काम करणार आहे. या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत ती छोटीशी भूमिका साकारणार असून राजन शाही यांची ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. टेलिव्हिजनवर दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी ही एक आहे. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता आता काजोलही यामध्ये दिसणार असून, काजोलच्या एपिसोडचा प्रोमोही व्हायरल होतोय.
काजोल सध्या ओटीटीवरील विविध परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. ती नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज २ या अँथॉलॉजी प्रोजेक्टमध्ये दिसली होती. याशिवाय सध्या अभिनेत्री डिझ्नी प्लस हॉटस्टारवरील ‘द ट्रायल’ या सीरिजमध्ये काम करते आहे. आता ती मालिकेत काम करणार आहे. काजोलच्या एंट्रीमुळे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका अधिकच खास होणार आहे. तिच्या नुकत्याच आलेल्या वेब सीरिजमधील ‘नयोनिका’ या पात्रामुळे चर्चेत आहे. याच सीरिजच्या प्रमोशनसाठी ती ‘ये रिश्ता…’ मध्ये दिसणार आहे. ती या मालिकेत ‘काजोल’ म्हणून नव्हे तर ‘नयोनिका’ बनून येणार आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सीरिजमध्ये हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड मुख्य भूमिकेत आहेत. ही जोडी ‘अभिमन्यू’ आणि ‘अक्षरा’ या भूमिका साकारात असून ते ‘अभिरा’ या नावाने लोकप्रिय आहेत. या मालिकेत त्यांचा घटस्फोट झाला असून अक्षराने अभिनवशी दुसरं लग्न केलं. अभिनवची भूमिका अभिनेता जय सोनी साकारत आहे.