Adinath Karkhana news of Mahesh Chivte and Dhananjay Dongre or Ramesha KambleAdinath Karkhana news of Mahesh Chivte and Dhananjay Dongre or Ramesha Kamble

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबेंदू समजल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून सध्या माजी अध्यक्ष रमेश कांबळे, प्रशासकीय संचालक महेश चिवटे व माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ‘कारखान्यातील जप्त केलेली शेतकऱ्यांची वाहने बेकायदा भंगारात विक्री करून लाखो रुपयांचा गैरव्यहवार केला’, असल्याचा आरोप प्रशासकीय संचालकांवर कांबळे यांनी केला. त्यावर चिवटे यांनी प्रत्यारोप करत ‘आदिनाथचे माजी अध्यक्ष डोंगरे यांनी कोट्यावधीचा गैव्यहवार केला आहे. याची चौकशी प्रशासकीय मंडळाने सुरू केली आहे. माजी उपाध्यक्ष कांबळे हे कधीही आर्थिक तडजोड न करणारे आहेत. मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डोंगरे हे आरोप करत आहेत’, असे म्हटले होते. त्याला आता डोंगरे यांनीही उत्तर दिले आहे. ‘आदिनाथ गळीत हंगाम सुरू करता येत नाही व ही जबाबदारी आपल्याला आता पेलता येत नाही हे लक्षात येताच चिवटे यांनी खोटे आरोप करून सभासदांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. साखर कारखाना चालविणे म्हणजे खताचे दुकान किंवा पिठाची गिरणी चालवणे एवढे सोपे नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन आदिनाथच्या निवडणुकीला सामोरे जावे,’ असा पलटवार डोंगरे यांनी केला आहे.

माजी उपाध्यक्ष कांबळे यांनी केलेला आरोप
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रशासक कार्यरत असून प्रशासकाने चोरीच्या मार्गाने लाखो रुपयाची वाहने विकून गैरव्यहवार केला आहे. या कारखान्याची निवडणूक लावण्यासाठी १० लाख रुपये भरण्यात आले होते. परंतु काही बाह्यशक्तींना हा कारखाना ताब्यात ठेवायचा होता म्हणून त्यांनी प्रशासकाचे नियुक्ती केली आहे. परंतु प्रशासकीय येताच त्यांनी कोणताही गैरव्यहवार करणार नाही, अशी शपथ घेतली होती. कोणत्याही प्रकारचे भंगारचे टेंडर न काढता व जप्त केलेली वाहन कोणत्याही प्रकारे कारखान्याला विक्री करता येत नसतानाही रातोरात कट करून विक्री केली आहे. विक्री केलेल्या वाहनांचे पैसे कारखान्याच्या खात्यावर भरलेले नसून कोणत्याही प्रकारची नोंद कारखान्याकडे नाही, परंतु ही सर्व वाहने कोणत्या वाहनातून कारखान्यातून भरून नेले व कशाप्रकारे कट करण्यात आली हे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने प्रशासक मंडळावर चोरीचा गुन्हा दाखल करून प्रशासक मंडळ बडतर्फ करून नवीन संचालक मंडळ नियुक्त करा, असे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांचे म्हणणे…
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर 2005 पूर्वी ज्या वाहतूकदारांनी कारखान्याचे पैसे थकवले आहेत, अशांची वाहने जप्त केलेली होती. या वाहन मालकांना अनेकवेळा कायदेशीर नोटीस देऊन कारखान्याची थकबाकी भरा व वाहने घेऊन जावा, असे कायदेशीररित्या कळवले होते. १८ वर्षात वाहन मालकांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे कारखान्याने भंगारात विकण्याचा निर्णय घेतला. याची किंमत ठरवण्यासाठी एक एजन्सीची नेमण्यात आली. त्या एजन्सीने किंमत निश्चित केल्यानंतर जाहीर लिलाव होणार आहे. या भंगार विक्रीतून कर्मचाऱ्यांचा एक पगार करण्याचे प्रशासकीय संचालकाचे नियोजन आहे. कारखान्यातून भंगारत एक गजाचा तुकडासुद्धा आत्तापर्यंत विकलेला नाही हे सिद्ध झाले तर आम्ही संचालकपदाचा राजीनामा देऊ. आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी कोट्यावधीचा गैरव्यहवार केला आहे. याची चौकशी सुरू आहे, यामुळे डोंगरे हे कांबळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करत आहेत. डोंगरे यांच्या काळात आदिनाथचे 82 लाख वीज बिल थकले. आदिनाथ कारखाना सुरू होऊ नये या दृष्टीतून आदिनाथ कारखाना चोरून लाईट घेतो, अशी तक्रार करून आदिनाथची विज तोडण्याचे पाप डोंगरे यांनी केले आहे, असा आरोप करण्यात आला. यामुळे आदिनाथची इतर कामे डिझेल जनरेटर सुरू करून करावी लागत आहेत, यात कारखान्याला रोज २० हजार रुपये डिझेल लागत आहे. शिखर बँकेने जप्त केलेली दोन लाख 28 हजार क्विंटल साखर अहमदनगर येथील कोटेच्या या एकाच व्यापाऱ्याला संशयस्पद व्यवहार करून 2910 ते 29 80 रुपये प्रति क्विंटल दराने विकली आहे. यावेळी साखरेची दर 3400 प्रतिक्विंटल होते. डोंगरे यांनी हिंमत असेल त्यांनी आमच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत.

माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्या उत्तर
आदिनाथचा गळीत हंगाम सुरू करता येत नाही व ही जबाबदारी आपल्याला आता पेलता येत नाही हे लक्षात येताच चिवटे यांनी माझ्यावर आरोप करून सभासदांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आदिनाथ कारखाना चालविणे म्हणजे एखादे खताचे दुकान किंवा पिठाची गिरणी चालवणे एवढे सोपे नाही. चिवतटे यांनी तत्काळ राजीनामा देऊन आदिनाथच्या निवडणुकीला सामोरे जावे. चिवटे यांनी केलेल्या बेछूट आरोपाबाबत खुलासा करीत सर्व आरोप खोटे असून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने व कोणताही अभ्यास न करता केलेले आहेत. मी कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवलेली नाही. आदिनाथच्या परस्पर केलेल्या भंगार विक्रीतून लाखो रूपयांचा गैरव्यहवार करून माया गोळा करण्याचे पाप प्रशासक मंडळाने केले आहे. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कोणत्या वाहनातून भंगार रातोरात विक्रीला गेले, कोणी नेले, वाहनाचे नंबर व फोटोही आहेत. शिवाय या वाहनांची कारखान्याच्या आवक- जावक नोंदवहीमध्ये कोणतीही वाहनांची नोंद नाही.

आदिनाथकडील थकीत वीज बिलाबाबत गतवर्षीच्या गळीत हंगामाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत वीज मंडळ अधिकार्‍यांना सूचना देऊन वीज बिलाचे टप्पे पाडून दिले. आता या टप्प्यानुसार वीजबील भरण्याची जबाबदारी ही प्रशासक मंडळाची आहे. स्टोअरमधील चोरीबाबत करमाळा पोलिस स्टेशनला एफआयआर आहे. दोन लाख २८ हजार साखर पोती विक्रीत गैरव्यहवार झाल्याचे चिवटे सांगतात पण शिखर बँकेने आदिनाथवर सरफेशी अॅक्टनुसार काऱवाई करून साखर पोती ताब्यात घेतली होती. म्हणजे साखर पोती ही पुर्णपणे शिखर बँकेच्या ताब्यात होती. त्यानुसार ज्यावेळी शिखर बँकेने साखर विक्री टेंडरचा निर्णय घेतला त्यावेळी मला कारखान्याचा अध्यक्ष म्हणून लेखी पत्र पाठवले होते. त्यामुळे मी टेंडरच्या वेळी फक्त संस्थेचा चेअरमन म्हणून उपस्थित होतो. साखर निर्यातीतही मी यापूर्वी अनेक वेळा प्रसार माध्यमातून वेळोवेळी खुलासा करून निर्यातीत कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. चिवटे यांनी बागल गटाच्या नेत्यांना सल्ला देण्याऐवजी स्वत ग्रामपंचायत, नगरपालिकामधून एकदा तरी निवडून येऊन दाखवावे. चिवटे हे शासन नियुक्त आहेत. हेही त्यांनी लक्षात ठेवावे. यापुढे बिनबुडाच्या तत्थहीन निराधार टीकेला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *