करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने थक हमीवर 150 कोटी कर्ज द्यावे या मागणीचा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागाने साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केला आहे.
राज्यातील जवळपास आजारी असलेल्या 27 साखर कारखान्याला यापूर्वी राज्य शासनाने थकहमीवर कर्ज देऊन या कारखान्यांना ऊर्जेत अवस्था आणली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्वतःच्या मालकीची अडीचशे एकर जमीन असून जवळपास 300 कोटीची मशिनरी आहे. मात्र केवळ १०० कोटी कर्जासाठी हा कारखाना अडचणीत आला असून या कारखान्याला राज्य शिखर बँकेकडून १५० कर्ज देऊन सरकारने या कारखान्याला मदत करावी, अशी मागणी प्रशासक बाळासाहेब बेंद्रे व प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी केली होती.
एनसीडीसीचे (दिल्ली) 25 कोटी व राज्य शिखर बँकेचे 21 कोटी या कारखान्याकडे थकले आहेत. कर्मचाऱ्यांची देणे व इतर शासकीय देणे प्रलंबित असून कारखान्याचे बाहेरून येणे जवळपास 15 कोटी आहे.
