करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘निवडणुक लढवता यावी म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला जात आहे. मात्र कारखाना चांगला चालवा म्हणून सहकार्य केले जात नाही’, असे म्हणत आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी भावनिक होऊन तालुक्यातील एकाही नेत्याचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
आदिनाथ कारखाना सध्या अडचणीत आहे. कारखान्याकडे यंत्रणा नसल्याने ऊस असतानाही कारखाना बंद करण्याची नामुष्की पत्करावी लागत आहे. कारखान्याचा प्रशासकीय सदस्य म्हणून कारखाना व्यवस्थित सुरु करण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्ने केला. मात्र श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारखान्याची बचत व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केला. प्रशासक येण्यापूर्वीचे कारखान्याचे सत्ताधारी बागल गटाचे नाव न घेता गुटाळ यांनी गेल्यावर्षीच्या आणि यावर्षीच्या खर्चाची तुलना सांगितली. (सविस्तर व्हिडीओ kaysangtaa च्या युट्युबवर आहे.)
गुटाळ म्हणाले, ‘कारखाना व्यवस्थित सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र यंत्रणा मिळाली नाही.’ सावंत यांचेही नाव न घेता ते ‘ते म्हणाले आमचे वरिष्ठ मार्गदर्शक यांनी कारखान्यासाठी पैसे दिले. यंत्रणा पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र यंत्रणा मिळू शकली नाही.’ पुढे बोलताना गुटाळ यांनी विश्वासात घेतले जात नाही व कारखान्याची मोळी टाकतेवेळी नेत्यांना बोलावले नाही या आरोपावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘तुम्ही म्हणताना मोळी टाकताना नेत्यांना बोलावले नाही. तर मग त्यांनी कारखान्याला ऊस कसं काय गाळपाला दिला. कारखाना अडचणीत असतानाही केवळ निवडणूक लढवता यावी म्हणून ते कार्यकर्त्यांना नावावर एक खेप टाकायला सांगत आहेत. निवडणूक लागणार म्हटले की, ऊस टाकला जातो मग कार्यक्रमाला येईला काय हलग्या लावून बोलवायचे का? तेथे येणे हेही नैतिक जबाबदारी आहे,’ असे म्हणत नेत्यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला आहे.
‘आम्हाला आता सल्लागार नेमून काय उपयोग? असा प्रश्न करत ‘आदिनाथ’च्या पाचपैकी तिघांनी सल्लागारपद नाकारले
पुढे बोलताना गुटाळ म्हणाले, ‘निवडणुकीत केवळ आरोप- प्रत्यारोप करण्यासाठी नेते स्वतःचा ऊस न पटवता कार्यकर्त्यांना नावावर एक खेप टाकायला सांगत आहेत. हे दुर्दैवी आहे. आदिनाथ कधीही सुरु होणार नाही, असे म्हणणाऱ्यांनी सर्वात आधी ऊस दिला आहे. हे केवळ राजकारण आहे’, असेही ते म्हणाले आहेत. आम्ही कारखाना सुरु करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. ही जबाबदारी आम्हीच स्वीकारत आहोत. त्याला कोणीही दोषी नाही. मात्र यापूर्वी कोणी काय केले ते योग्य वेळी आम्ही सांगू,’ असे म्हणत त्यांनी इशाराही दिला आहे.