मुंबई : ‘आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, मग भाजपबरोबर का नाही?’ असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीत करून पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभाग होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मंत्री छगन भूजबळ, प्रफुल पटेल व धनंजय मुंडे उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीवरच दावा केला असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाला महत्व देत आम्ही शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षाची जेव्हा बैठक झाली त्यात काहीच आउटफूट निघत नाही. शुक्रवारी मी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला होता, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
जातीयवादी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेबरोबर आम्ही साडेतीन वर्षांपूर्वी गेलो होतो. मग भाजपबरोबर का जाऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. येणाऱ्या काळात तरुणांना संधी देणे व इतर मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. टीकाटिपणीला फार महत्व न देता आम्ही काम करत राहणार असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे. बहुतेक सर्व आमदारांना हा निर्णय मान्य असून पुढे राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही काम करत राहणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चिन्ह घेऊनच आम्ही लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. बाकीचे सर्व आमदारही आमच्याबरोबर येणार असून शरद पवार यांचा आशीर्वाद आहे का असे विचारले तेव्हा मात्र सर्वांचा आशीर्वाद असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.