कोणी काहीही दावा केला तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही जनतेत जाऊ, असे म्हणतानाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्याबरोबरच्या आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. अजित पवार यांच्याबाबतचा झालेला प्रकार मला नवीन नाही, असेही ते म्हणाले आहेत. मला अनेक लोकांचे फोन आले असून आम्ही पुन्हा जनतेत जाऊ असे, पवार यांनी पत्रकारांना सांगितले आहे. मी आणि माझ्याबरोबर असलेले असंख्य तरुण पुनः संघटना बांधण्यासाठी प्रयत्न करू. उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मी स्वतः केलेल्या आहेत. अजित पवार यांनी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे आजच माध्यमांमधून समजले आहे, असे पवार म्हणाले आहेत.