करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत. शिंदे यांना 80 हजार 6 मते मिळाली आहेत. तर पाटील यांना 96 हजार 91 मते मिळाली असून त्यांचा 16 हजार 85 मतांनी विजयी झाला आहे. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना 40 हजार 834 मते मिळाली. मात्र बागल गटाची गेल्यावर्षीपेक्षा मतं कमी झाली आहेत. शिंदे यांचे मताधिक्य वाढले पण ते विजयापर्यंत जाऊ शकले नाही. प्रा. झोळ यांना तर ५ हजाराच्या आतच मते मिळाली आहेत. प्रचाराच्या सुरुवातीलाच पाटील गटाने शिंदे हे माढा तालुक्यात रिव्हर्स आहेत हे सांगायला सुरु केले आणि तशी मानसिकता करमाळा तालुक्यात मतदारांची करत राहिले. हि मानसिकता शिंदे बदलू शकले नाहीत.
करमाळा विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. २०१४ मध्ये अवघ्या २५७ मतांनी पाटील यांचा निसटता विजय झाला होता. तेव्हा त्यांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये शिंदे यांनी पाटील यांचा ५ हजार ४९४ मतांनी पराभव करत विजयाचा गुलाल अंगावर घेतला होता. यावेळी मात्र राजकीय चातुर्याने पाटील यांनी शिंदे यांचा पराभव करत तब्बल 16 हजार 85 मतांनी विजयी संपादन करत २०१४ च्या निकालाचे रेकॉर्ड त्यांच्याच विजयाने यावेळी मोडले आहे.
पाटील यांच्या विजयाची वैशिष्ट्ये
१) २०१४ मध्ये विजयी झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात पश्चिम भागात जोडणारे रस्ते प्राधान्याने केले. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘रोडकिंग’ म्हणून झाला. तोच मुद्दा त्यांनी या निवडणुकीत मांडला आणि तो मतदारांना भावला.
२) दहिगाव उपसासिंचन योजनेबाबत २०१४ ते १९ दरम्यान त्यांनी केलेले काम या निवडणुकीत त्यांनी मतदारांसमोर मांडले.
३) आमदार शिंदे यांनी ३ हजार ४९० कोटींचा विकास केला हा मुद्दा पुराव्यासह मांडला. परंतु तो पाटील यांनी खुडून काढत विकास झाला नसल्याचे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात पाटील यांना यश आले.
४) ‘आपला माणूस’ म्हणत प्रचारात ‘भूमीपुत्रा’चा मुद्दा गाजला.
५) ‘विश्वास जुना आबाच पुन्हा’ हे वाक्य सुरुवातीपासून पाटील गटाने वापरले त्याचाही प्रभाव निर्माण झाला.
६) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला.
७) लोकसभा निवडणुकीत माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्र्वादीत गेले आणि आणि विजयी झाले तेव्हापासून पाटील गटात उत्साह वाढत गेला.
८) माजी जयवंतराव जगताप व सावंत यांनी शिंदे यांचा पाठींबा काढत पाटील यांना पाठींबा दिल्याने वातावरण निर्माण झाले.
९) शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या ३६ गावात विशेष लक्ष ठेऊन मतदान करून घेतले.
१०) जरांगे फॅक्टरची योग्यरीत्या हाताळणी केली.