करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी रस्त्यावरील पांडे ओढ्यावरील धोकादायक पुलाकडे त्वरित लक्ष द्यावे या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. संतप्त नागरिक याबाबत करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र उपकार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे बंद दरवाजाला निवेदन लावण्यात आले आहे. सावंत गटाचे प्रमुख व सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील सावंत यांच्या उपस्थितमध्ये हे निवेदन देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता के. एस. उबाळे हे निवेदन घेण्यास अनुउपस्थित असल्याने त्यांच्या दरवाजावर हे निवेदन चिटकवण्यात आले. करमाळा- गुळसडी मार्गावरील पुल पावसामध्ये वाहून गेला आहे. दोन वर्षापासून सातत्याने या पुलाचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांची आहे. दोन वर्षांपूर्वी एक नागरिक या पुलावर आलेल्या पाण्यात वाहून गेला होता. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पुलाचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार तसेच पुलावर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील, असे यावेळी सांगण्यात आले आहे. मानसिंग खंडागळे, सुनील सावंत, अतुल फंड, फारूक जमादार, विनोद महानवर, श्रीकांत ढवळे यावेळी उपस्थित होते.