करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्यास अडचणी येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम अर्ज दाखल होण्यावर झाला आहे. मात्र सोमवारपर्यंतच (ता. १७) अर्ज दाखल करण्यास मुदत असून शेवटच्या दोन दिवसात यंत्रणेवर ताण येऊ शकतो याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रविवारी देखील ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु ठेवण्याचा आदेश काढला आहे.
तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचणी येत होत्या. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकात शासकीय सुट्टी दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे सांगितले होते. मात्र अडचण लक्षात घेऊन रविवारीही कामकाज सुरु ठेवले आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी काढला आहे.
