करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरु आहे. याला प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोग कारणीभूत आहेत. याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा ओहोळ यांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. रोजगार हमीच्या कामात दुजाभाव केला जात असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात नागरिक आहेत.
करमाळा तालुक्यात सध्या रोजगार हमीअंतर्गत विहिरींची कामे सुरु आहेत. या कामामध्ये तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके हे दुजाभाव करत आहेत. मंजूर झालेली कामे करण्यासाठी ते अडकाव करून कामे बंद पाडत आहेत. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला वेगळा नियम असे त्यांचे काम सुरु झाले आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई, करण्याची गरज आहे.
बिटरगाव श्री येथे सीना नदीच्या कडेला क्षेत्र असलेल्या एका शेतकऱ्याची विहीर मंजूर झालेली आहे. मात्र ती विहीर करण्यासाठी फाळके यांनी बेकायदा अडथळा आणलेला आहे. या प्रकाराला प्रभारी गटविकास अधिकारी भोग हेही जबाबदार आहेत. विहीर मंजूर करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मंजूर झालेली विहीर फाळके व भोंग यांनी संगणमत करून अडथळा आणून काम होणार नाही अशी, व्यवस्था करत आहेत. याकडे त्वरित लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.