करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियान अंतर्गत सोलापुरात होटगी रोड येथील सिद्धेश्वर साखर करखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात विविध योजनांची माहिती व लाभ वाटप कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सर्व गावात ग्रामपंचायतीच्या वतीने लाभार्थ्याना जाता यावे म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत कोणत्याही लाभार्थ्याची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था करण्याची सूचना सर्व ग्रामसेवकाना गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिल्या आहेत.
सोलापूरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्याना विविध योजनाचे लाभ दिले जाणार आहेत. याशिवाय त्यांना कागदपत्रेही मिळवून दिली जाणार आहेत. घरकुल, विविध परवाने, तीनचाकी सायकल, शैक्षणिक मदत, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय मदत, फिरता स्टॉल, पेन्शन योजना आशा प्रकारच्या योजनाचे लाभ दिले जाणार आहेत. यासाठी करमाळ्यातून लाभार्थ्याला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या गावातून जाता येईल असे नियोजन केले जाणार आहे, लाभार्थ्याने गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.