करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या बरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी देऊन विषारी औषध पाजून एका विवाहित २२ वर्षाच्या महिलेला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील रावगाव येथील महिलेने यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून देवळाली येथील एकाविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिला व संशयित आरोपी यांच्यात कामावर असताना ओळख झाली. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते पुणे येथे एका ठिकाणी कामासाठी गेले होते. तेव्हा या प्रकरणामध्ये फिर्यादी हरवले असल्याचे म्हणून करमाळा पोलिसात पतीच्या तक्रारीवरून नोंद झाली होती. दरम्यान संशयित आरोपी हा फिर्यादीच्या पतीच्या मोबाईलवर सतत मेसेज करत होता. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने संबंधित सिमकार्ड बंद केले होते.
त्यानंतर फिर्यादीच्या घरी कोणी नसताना संशयित आरोपी घरी आला. ‘तु माझ्याबरोबर चल, तू नाही आली तर खल्लास करीन, तुझ्या कुटुंबातील कोणालाच सोडणार नाही’, असे म्हणत धमकी दिली. मात्र भीतीमुळे तिने हा प्रकार तिने कोणालाच सांगितला नाही. मात्र त्यानंतरही टो सतत दमदाटी करत होता. डिसेंबरमध्ये फिर्यादी ही करमाळ्यात आठवडी बाजाराला आली होती. तेव्हा करमाळा एसटी स्टँड येथे संशयित आरोपी व फिर्यादी यांची भेट झाली. त्यानंतर तो तिला दमदाटी करून पुण्याला घेऊन गेला. तेथे पती- पत्नी असल्याचे सांगून एका ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून कामाला लागला. तर फिर्यादी ही एका खासगी कंपनीत कामाला होती. मात्र टो तिला सतत मारहाण करत होता.
दरम्यान संशयित तेथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी तेथून तीच्या गावी आली. त्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने फिर्यादीला माझ्याबरोबर पाठवून दे नाही तर तिचे फोटो सोशल मिडियावर टाकेन अशी धमकी दिली. दरम्यान पुन्हा 5 ऑगस्टला त्याने घरी कोण नसताना फिर्यादीला नेहण्यासाठी आला. तेव्हा तिने नकार दिला. तेव्हा त्याने मारहाण करून तिला बळजबरीने विषारी औषध पाजले, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादिवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार 5 ऑगस्टला घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.